ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना सोमवारी नाशिककरांतर्फे 'भावसुमनांजली'; 'रात्र आहे पौर्णिमेची' संगीत सोहळ्याचे आयोजन
स्वर्गीय ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या मासिक स्मृतिदिनानिमित्त नाशिकमध्ये सोमवारी (२९ जून) 'भावसुमनांजली' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाकवी कालिदास कला मंदिर येथे होणाऱ्या या विनामूल्य संगीत सोहळ्यात सुमनताईंची अजरामर मराठी व हिंदी गीते सादर केली जाणार असून रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक ब्यूरो
मराठी आणि हिंदी भावगीत तसेच चित्रपटसंगीताच्या विश्वात आपल्या मधुर आवाजाने अजरामर ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ गायिका स्वर्गीय सुमन कल्याणपूर यांना नाशिककरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवारी (दि. २९ जून) 'भावसुमनांजली' या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुमनताईंच्या मासिक स्मृतिदिनानिमित्त नाशिक महानगरपालिका आणि क्षितिज प्रस्तुत 'रात्र आहे पौर्णिमेची' हा संगीत सोहळा सायंकाळी ६.३० वाजता महाकवी कालिदास कला मंदिर, शालिमार चौक, नाशिक येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत सुमनताईंना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
यानंतर गायिका विद्या कुलकर्णी, मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे आणि क्षितिजा कुलकर्णी हे सुमन कल्याणपूर यांनी अजरामर केलेली मराठी व हिंदी गीते सादर करणार आहेत.
वाद्यसाथीमध्ये अनिल धुमाळ (सिंथेसायझर), प्रणव हरिदास (बासरी), शुभांगी भावसार (हार्मोनियम), महेश कुलकर्णी (गिटार), आदित्य कुलकर्णी (तबला), अभिजीत शर्मा (ऑक्टोपॅड) आणि महेंद्र फुलपगार (तालवाद्य) यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन अमेय रानडे करणार आहेत.
कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून नाशिककर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर हिमगौरी आडके, आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, गटनेते ॲड. शाम बडोदे, अजय बोरस्ते, सीमा ठाकरे, केशव पोरजे तसेच कार्यक्रमाचे निर्माता सुधीर कुलकर्णी यांनी केले आहे.
३५ वर्षांनंतरचा भारतातील पहिला सार्वजनिक कार्यक्रम नाशिकमध्ये
२०१० मध्ये विद्या कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात सुमन कल्याणपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य संगीत कार्यक्रम आयोजित केला होता. भारतात तब्बल ३५ वर्षांनंतर झालेला सुमनताईंचा हा पहिला सार्वजनिक कार्यक्रम असल्याचे मानले जाते.
या कार्यक्रमात सुमनताईंची कन्या चारूल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मंगला खाडीलकर यांच्या प्रभावी निवेदनातून 'जुळल्या सुरेल तारा' या कार्यक्रमाद्वारे सुमनताईंचा जीवनप्रवास रसिकांसमोर उलगडण्यात आला होता. त्या अविस्मरणीय क्षणांची आठवण 'भावसुमनांजली' कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जागविण्यात येणार आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0