पायधुणी अत्याचारप्रकरणातील पीडित चिमुरडीच्या उपचारासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून ₹२ लाखांची मदत
मुंबईतील पायधुणी परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणानंतर तिच्या उपचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक निधीतून ₹२ लाखांची आर्थिक मदत दिली आहे. आमदार निलेश राणे यांच्या पुढाकारातून ही मदत पीडित कुटुंबाला सुपूर्द करण्यात आली.
प्रतिनिधी. | मिलिंद कारेकर
मुंबई : पायधुणी परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या धक्कादायक घटनेनंतर पीडितेच्या उपचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वैयक्तिक निधीतून ₹२ लाखांची तातडीची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने ही मदत पीडित कुटुंबापर्यंत पोहोचविण्यात आली.
गेल्या आठवड्यात पायधुणी येथे एका सुरक्षा रक्षकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असल्याने उपचारासाठी आवश्यक आर्थिक सहाय्याची गरज निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शिंदे यांनी त्यांच्या वैयक्तिक निधीतून ₹२ लाखांची मदत जाहीर केली. ही मदत मुलीच्या वेदना कमी करू शकणार नसली, तरी उपचारासाठी आर्थिक आधार मिळावा आणि संकटाच्या काळात कुटुंबाच्या पाठीशी शासन व समाज उभा आहे, हा विश्वास देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
शिवसेनेच्या उपनेत्या आशाताई मामेडी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पीडित मुलीच्या कुटुंबीयांना उपचारासाठी ₹२ लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
या अमानुष घटनेनंतर पायधुणी परिसरात संतापाची लाट उसळली होती. स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. काही काळ परिसरात रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पीडित कुटुंबीयांनी उपचारासाठी मिळालेल्या आर्थिक मदतीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मदतीसाठी पुढाकार घेतलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0