३० जूनपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवा; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई
महाराष्ट्रातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर ३० जून २०२६ पर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक आहे. १ जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई होणार असून, एचएसआरपी नसलेल्या वाहनांना आरटीओच्या अनेक सेवाही मिळणार नाहीत.
मुंबई प्रतिनिधी | नरेश शिंदे
मुंबई, दि. २९ : राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत असून, त्यानंतर १ जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच एचएसआरपी नसलेल्या वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) अनेक महत्त्वाच्या सेवांपासूनही वंचित राहावे लागणार आहे.
परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एचएसआरपी नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनधारकांना वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल तसेच वाहन परवान्याचे नूतनीकरण यांसारख्या सेवांचा लाभ मिळणार नाही. मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, ३० जूनपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना १ जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे.
तीन झोनमध्ये कंपन्यांची नियुक्ती
राज्यात एचएसआरपी बसविण्यासाठी तीन झोन निश्चित करण्यात आले आहेत. झोन १ साठी रोझमेर्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, झोन २ साठी रिअल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि झोन ३ साठी एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रा. लि. या अधिकृत कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एचएसआरपी बसविण्याचे अधिकृत दर
परिवहन विभागाने निश्चित केलेले दर पुढीलप्रमाणे आहेत –
दुचाकी : ₹४५०
तीनचाकी : ₹५००
हलकी मोटार वाहने तसेच मध्यम व अवजड व्यावसायिक वाहने : ₹७४५
(वरील दर जीएसटी वगळून असून फिटमेंट शुल्कासह आहेत.)
नियमभंगावर संयुक्त कारवाई
केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० आणि मोटार वाहन अधिनियमातील कलम १७७ अन्वये पोलीस व परिवहन विभाग संयुक्त किंवा स्वतंत्रपणे कारवाई करणार आहेत.
परिवहन विभागाचे सहआयुक्त शैलेश कामत यांनी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच वाहनधारकांनी ३० जूनपूर्वी आपल्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसवून नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1