कशेळी–मुलुंड जलबोगदा प्रकल्पाची कामे निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करा; अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश
मुंबईच्या भविष्यातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या कशेळी–मुलुंड जलबोगदा प्रकल्पाची पाहणी अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली. प्रकल्पाची कामे निर्धारित वेळेत, सुरक्षिततेच्या निकषांचे पालन करून आणि उच्च गुणवत्तेसह पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मुंबई | प्रतिनिधी देवानंद शिंदे
मुंबईच्या वाढत्या पाणीगरजा लक्षात घेऊन राबविण्यात येत असलेल्या कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाका जलबोगदा प्रकल्पाची कामे निर्धारित वेळेत, उच्च दर्जाची आणि सुरक्षिततेच्या सर्व निकषांचे पालन करून पूर्ण करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.
अभिजीत बांगर यांनी मुलुंड जकात नाका येथील प्रकल्पस्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांकडून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
मुंबईचा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प
महानगरपालिकेतर्फे कशेळी महासंतुलन जलाशय ते कशेळी आणि कशेळी ते मुलुंड जकात नाका दरम्यान दोन स्वतंत्र जलबोगदे उभारले जात आहेत. या प्रकल्पामुळे पाणी वितरणातील गळती कमी होऊन मुंबईचा पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम आणि सक्षम होणार आहे.
अभिजीत बांगर यांनी सांगितले की, भातसा धरणातील पाणी मुंबई-II आणि मुंबई-III या मुख्य जलवाहिन्यांद्वारे शहरात आणले जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यातील पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प ऑक्टोबर २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
७.१३ किलोमीटर लांबीचा अत्याधुनिक जलबोगदा
प्रकल्पांतर्गत ७.१३ किलोमीटर लांबीचा आणि ४.५ मीटर व्यासाचा जलबोगदा उभारला जात आहे. यासाठी आवश्यक बाथिमेट्रिक सर्वेक्षण, भू-तांत्रिक तपासणी आणि स्थलाकृतिक सर्वेक्षण पूर्ण झाले असून, मुलुंड येथील १३४ मीटर खोल लॉन्चिंग शाफ्टसह असेंब्ली टनेल, टेल टनेल आणि ट्यूब टनेलचे उत्खननही पूर्ण झाले आहे.
कशेळी येथे १२८ मीटर खोल पुनर्प्राप्ती शाफ्ट उभारण्याचे काम सुरू असून, त्यापैकी २७ मीटर खोलीपर्यंत उत्खनन पूर्ण झाले आहे.
सप्टेंबर २०२६ पासून टीबीएमद्वारे बोगदा खोदकाम
प्रकल्पासाठी आवश्यक ५.३ मीटर व्यासाचे टनेल बोरिंग मशीन (TBM) तसेच १४ किलोमीटर लांबीची कन्व्हेयर प्रणाली प्रकल्पस्थळी दाखल झाली आहे. सप्टेंबर २०२६ पासून टीबीएमच्या साहाय्याने प्रत्यक्ष बोगदा खोदकाम सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती अभिजीत बांगर यांनी दिली.
तृतीय संस्करण केलेल्या पाण्यासाठी स्वतंत्र जलबोगदे
यावेळी अभिजीत बांगर यांनी घाटकोपर ते भांडुप आणि धारावी ते घाटकोपर या तृतीय संस्करण (Tertiary Treatment) केलेले पाणी वाहून नेणाऱ्या जल बोगदा प्रकल्पांचाही आढावा घेतला.
भांडुप संकुल येथे शाफ्टच्या उत्खननाची कामे वेगाने सुरू असून, जानेवारी २०२७ पासून या प्रकल्पाच्या बोगदा खोदकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली.
पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी होणार
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तृतीय संस्करण केलेले पाणी औद्योगिक आणि बिगर-पेयजल वापरासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. त्यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी होण्यास मदत होईल आणि मुंबईतील जलसंपत्तीचे अधिक शाश्वत व्यवस्थापन शक्य होईल.
या पाहणी दौऱ्यावेळी प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प) चंद्रकांत चौधरी यांच्यासह संबंधित अभियंते आणि अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0