होमिओपॅथी, आयुर्वेदिक, योगा महाविद्यालयांसह ग्रामीण आरोग्य पथक परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलदगतीने उभारा : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूरातील विविध शासकीय होमिओपॅथी, आयुर्वेदिक, योगा व निसर्गोपचार महाविद्यालयांच्या बांधकामांचा आढावा घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाणी, वीज, रस्ते, एसटीपीसह अत्यावश्यक सुविधा तातडीने उभारण्याचे निर्देश दिले.

Jul 18, 2026 - 20:49
 0  7
होमिओपॅथी, आयुर्वेदिक, योगा महाविद्यालयांसह ग्रामीण आरोग्य पथक परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलदगतीने उभारा : मंत्री हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री, होमिओपॅथी महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय,

कोल्हापूर | प्रतिनिधी : उमेश जाधव 

मौजे सांगाव (ता. कागल) येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय, पिंपळगाव खुर्द येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, उत्तूर येथील शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालय तसेच कागल येथील ग्रामीण आरोग्य पथक परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलदगतीने उभाराव्यात, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सुरू असलेली सर्व बांधकामे विहित मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

बैठकीदरम्यान पाणीपुरवठा, वीज, अंतर्गत रस्ते, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) आणि इतर मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या. विद्यार्थी, रुग्ण आणि कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी पिंपळगाव खुर्द येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामाची प्रगती, सांगाव येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयासाठी आवश्यक पर्यावरणीय नाहरकत प्रमाणपत्राची उपलब्धता तसेच उत्तूर येथील शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामाचा सविस्तर आढावा घेतला.

बैठकीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, शासकीय आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे, उत्तूर येथील शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरूड, कार्यकारी अभियंते श्री. मिरजकर आणि श्री. हजारे, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे बांधकाम सल्लागार श्री. तायवाडे-पाटील, एअरबॉन्ड लिमिटेडचे श्री. शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रकल्पांतील उर्वरित कामे वेळेत पूर्ण करावीत आणि कोल्हापूर जिल्ह्यात आधुनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0