उत्तर महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या आधुनिक आरोग्यसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात; अशोका हेल्थ सिटीचे लोकार्पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते**
नाशिकमध्ये अशोका हेल्थ सिटी आणि अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलचे लोकार्पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाले. उत्तर महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या, आधुनिक आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचे सांगत, अशोका हेल्थ सिटी ही उपचाराबरोबरच संशोधनाचेही केंद्र बनावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नाशिक | ब्यूरो
उत्तर महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या, आधुनिक आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात होत असून, अशोका हेल्थ सिटी ही केवळ उपचाराचे केंद्र न राहता वैद्यकीय संशोधन आणि शिक्षणाचेही प्रमुख केंद्र बनावे, अशी अपेक्षा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केली.
नाशिक येथे रविवारी अशोका हेल्थ सिटी आणि अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटल यांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, अशोका ग्रुपचे चेअरमन अशोक कटारिया, व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख, संचालक डॉ. सुशील पारख आणि अंकिता पारख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, केंद्र व राज्य शासन नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी विविध योजना राबवत असून, त्याचबरोबर खाजगी क्षेत्राची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. अशोका ग्रुपने उत्तर महाराष्ट्रात उभारलेली ही आरोग्यनगरी अत्याधुनिक उपचार, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्णकेंद्रित सेवा यांचा संगम असून, यामुळे या भागातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या सुपर स्पेशालिटी आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.
ते पुढे म्हणाले की, नाशिक हे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचे शहर असून, श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगामुळे त्याची देशभर ओळख आहे. आता अशोका हेल्थ सिटीच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातही नाशिकला नवी ओळख मिळणार आहे. गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचे हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.
योग, संतुलित जीवनशैली आणि पर्यावरणपूरक सवयींचा निरोगी जीवनासाठी मोठा वाटा असल्याचे सांगताना त्यांनी कोरोना काळात देशात झालेल्या संशोधनाचा उल्लेख केला. नाविन्यपूर्ण संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय नवकल्पनांच्या माध्यमातून अशोका हेल्थ सिटीने संशोधन क्षेत्रातही आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. किफायतशीर आणि गुणवत्तापूर्ण उपचार नागरिकांना उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अशोका ग्रुपचे चेअरमन अशोक कटारिया यांनी सांगितले की, गेली २५ वर्षे पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत असलेला अशोका ग्रुप समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही दर्जेदार सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. नाशिक ही आपली कर्मभूमी असून, या परिसरातील नागरिकांना सर्वोत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न कायम राहील, असे त्यांनी सांगितले.
अशोका हेल्थ सिटीमध्ये अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटल, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका तसेच लवकरच सुरू होणारे अशोका कॉलेज ऑफ नर्सिंग एक्सलन्स अशा महत्त्वाच्या संस्था एकाच परिसरात कार्यरत राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या लोकार्पण सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय सल्लागार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा प्रभू श्रीरामांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंकिता पारख यांनी केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0