सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : घाटांची कामे मार्च २०२७ पर्यंत गुणवत्तापूर्ण पूर्ण करा; मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीचा आढावा घेताना कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घाट, रस्ते आणि पायाभूत सुविधा विकासाची सर्व कामे मार्च २०२७ पर्यंत दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.

Jul 19, 2026 - 22:30
 0  6
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : घाटांची कामे मार्च २०२७ पर्यंत गुणवत्तापूर्ण पूर्ण करा; मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश
सिंहस्थ कुंभमेळा २०२७, गिरीश महाजन, नाशिक कुंभमेळा,

नाशिक ब्यूरो 

नाशिक, दि. १९ : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या घाट, रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांच्या विकासकामांचा आढावा घेत राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व कामे मार्च २०२७ पूर्वी गुणवत्तापूर्ण आणि विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले.

रविवारी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची बैठक मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला महापौर हिमगौरी आडके-आहेर, उपमहापौर विलास शिंदे, प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या घाट विकास, रस्ते आणि पूरक पायाभूत सुविधांच्या कामांची अद्ययावत प्रगती, अंमलबजावणीतील अडचणी, विभागीय समन्वय आणि प्रलंबित बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक प्रकल्पाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक समन्वयाने काम करण्याच्या सूचना मंत्री महाजन यांनी दिल्या.

ते म्हणाले की, कामांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी जलसंपदा, महसूल, भूमी अभिलेख, पोलीस आणि वन विभागाने समन्वय साधून जबाबदारीने काम करावे. भूसंपादन, प्रशासकीय परवानग्या आणि इतर तांत्रिक बाबी वेळेत पूर्ण झाल्यास विकासकामांना अधिक गती मिळेल.

बैठकीत गोदावरी-कपिला संगम, टाकळी येथील गोदावरी-नंदिनी संगम परिसर, ओढा रामघाट, दसक शिवार, नांदूर परिसरातील घाट विकास, त्र्यंबकेश्वर येथील नवीन घाट बांधकाम, गौतमी गोदावरी धरण ते त्र्यंबकेश्वर उपसा प्रणाली योजना तसेच नंदिनी संगमावरील रबर (बलून) बंधाऱ्याचे काम यांसह विविध महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांनी सादरीकरणाद्वारे विविध प्रकल्पांची माहिती दिली. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनीही सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या विकासकामांचा अहवाल बैठकीत सादर केला.

बैठकीस संबंधित प्रकल्पांचे भूसंपादन अधिकारी, महसूल अधिकारी, कार्यकारी अभियंते आणि प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी भाविकांना सुरक्षित, सुसज्ज आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सर्व विकासकामांना प्राधान्याने गती देण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1