देशातील सर्वाधिक वृक्ष असलेले शहर म्हणून नाशिकची ओळख निर्माण करू; ‘मिशन ग्रीन मान्सून’ अंतर्गत नंदिनी नदीकाठी भव्य वृक्षारोपण – मंत्री गिरीश महाजन
उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत 'मिशन ग्रीन मान्सून'च्या तिसऱ्या टप्प्यात नंदिनी नदीच्या दोन्ही तीरांवर हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकला देशातील सर्वाधिक वृक्ष असलेले शहर बनविण्याचा संकल्प व्यक्त केला.
नाशिक | प्रतिनिधी
'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या 'हरित कुंभ – हरित मान्सून' अर्थात 'मिशन ग्रीन मान्सून' अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात रविवारी नंदिनी नदीच्या दोन्ही तीरांवर मोठ्या उत्साहात भव्य वृक्षारोपण करण्यात आले. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वृक्षलागवडीचा शुभारंभ करण्यात आला. सामाजिक, धार्मिक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, युवक, महिला आणि हजारो पर्यावरणप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम लोकचळवळीचे स्वरूप धारण करताना दिसून आला.
सकाळी पिंपळगाव बहुला येथील महादेव मंदिर परिसरात तसेच भाभानगर परिसरातील नंदिनी नदीच्या काठावर हजारो देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, "स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि हरित नाशिक घडविण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला आहे. हा केवळ शासनाचा कार्यक्रम नसून प्रत्येक नाशिककराचा संकल्प आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला पर्यावरणपूरक, नियोजनबद्ध आणि आदर्श शहर म्हणून विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे."
ते पुढे म्हणाले, "देशातील सर्वाधिक वृक्ष असलेले शहर म्हणून नाशिकची ओळख निर्माण करणे हे आपले सामूहिक ध्येय आहे. शासनासोबत सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, उद्योग क्षेत्र आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या अभियानाच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा पर्यावरण संवर्धनाविषयीची त्यांची बांधिलकी दर्शवितो."
'मिशन ग्रीन मान्सून' अंतर्गत यापूर्वी शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नंदिनी नदी महास्वच्छता अभियान राबवून नदीपात्राची स्वच्छता, खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली. आता नदीच्या दोन्ही तीरांवर देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून नंदिनी नदीला कायमस्वरूपी हरित संरक्षण कवच देण्याचा संकल्प प्रत्यक्षात साकारला जात आहे.
या अभियानात विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी, युवक, महिला, विद्यार्थी, स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या नाणीज पीठाचे अनुयायी तसेच अनेक सेवाभावी संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वृक्षलागवडीसोबतच त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची सामूहिक शपथही यावेळी घेण्यात आली.
याच कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनासाठी सातपूर विभागाचे सभापती समाधान देवरे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या 'निर्माल्य संकलन रथ' आणि 'गोमाता दान सेवा रथ' या उपक्रमांचे उद्घाटनही मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. धार्मिक निर्माल्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन, गोसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने हे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.
यावेळी पिंपळगाव बहुला येथे नंदिनी नदीचे जलपूजनही मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात 'प्लास्टिकमुक्त नाशिक' हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. नंदिनी नदीच्या दोन्ही तीरांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून नदीचे वैभव पुनर्स्थापित करण्यासाठी सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक महानगरपालिकेला आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत दहापट निधी प्राप्त झाला असून, शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. ही विकासकामे पूर्ण झाल्यानंतर नाशिक हे केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या नकाशावर आधुनिक सुविधा, पर्यावरणपूरक विकास आणि उत्कृष्ट नागरी व्यवस्थापनासाठी ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आडके, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, भाजप उत्तर महाराष्ट्र माध्यम विभाग प्रमुख गोविंद बोरसे, सभापती समाधान देवरे, विविध लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी आणि हजारो नागरिक उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0