आपला कुंभ, आपली जबाबदारी' पुस्तिका जनजागृतीसाठी उपयुक्त; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या जनजागृतीसाठी सिंहस्थ सहायक समितीने प्रकाशित केलेल्या 'आपला कुंभ, आपली जबाबदारी' या पुस्तिकेचे प्रकाशन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. सिंहस्थाची परंपरा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही पुस्तिका उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक ब्यूरो |
नाशिक, दि. १९ : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृती आणि जनसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने सिंहस्थ सहायक समितीने प्रकाशित केलेल्या 'आपला कुंभ, आपली जबाबदारी' या पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याची शेकडो वर्षांची परंपरा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही पुस्तिका अत्यंत उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
रविवारी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीपूर्वी आयोजित छोटेखानी समारंभात 'सिंहस्थ कुंभ पर्व : सोहळा जनजागरणाचा, भावजागरणाचा, जनसहभागाचा' या संकल्पनेवर आधारित पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला महापौर हिमगौरी आडके-आहेर, प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, सिंहस्थ सहायक समितीचे गिरीश सातपुते यांच्यासह विविध अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
पुस्तिकेच्या प्रकाशनानंतर आनंदवल्ली येथील महापालिका शाळा क्रमांक १८ मधील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. विजय वैश्यपायन यांनी सादरीकरणाद्वारे पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या सिंहस्थ कुंभपर्वाविषयीच्या माहितीची उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. तसेच पुस्तिका निर्मितीत योगदान देणाऱ्या लेखक, कलाकार आणि सहकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सिंहस्थ सहायक समितीचे गिरीश सातपुते यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा सत्कार केला. तसेच बैठकीपूर्वी कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयातील नूतनीकरण करण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटनही मंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी योगदान देणाऱ्या अभियंत्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या जनजागृतीसाठी आकाशवाणी नाशिक केंद्रावरून 'सोहळा कुंभ पर्वाचा' ही ७२ भागांची विशेष रेडिओ मालिका सोमवार, २० जुलैपासून प्रसारित होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जनसहभाग, जनजागृती आणि धार्मिक परंपरांचे जतन यांना प्राधान्य देत विविध उपक्रम राबविण्यात येत असून, 'आपला कुंभ, आपली जबाबदारी' ही पुस्तिका या अभियानातील महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0