अकोले तहसील कार्यालयासमोर कांदे ओतून किसान सभेचे तीव्र आंदोलन

कांद्याला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा आणि कमी दरात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अकोले तहसील कार्यालयासमोर कांदे ओतून आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

May 29, 2026 - 19:55
 0  3
अकोले तहसील कार्यालयासमोर कांदे ओतून किसान सभेचे तीव्र आंदोलन
कांदा आंदोलन, किसान सभा, अकोले तहसील कार्यालय,

नाशिक ब्युरो |

कांद्याला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, तसेच कमी दरात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान जाहीर करून हा निर्णय संपूर्ण राज्यभर लागू करावा, या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात कांदे ओतून सरकारच्या धोरणांविरोधात निषेध नोंदविला. आंदोलनापूर्वी अकोले शहरातून जोरदार मिरवणूक काढण्यात आली. घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर उत्पादन खर्चापेक्षाही खाली गेले असून वाहतूक, मजुरी, साठवणूक आणि शेती खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नसल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

अवकाळी पाऊस, हवामान बदल आणि वाढते उत्पादन खर्च यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पडलेल्या बाजारभावांचा दुहेरी फटका बसत आहे. केंद्र सरकारकडून वारंवार लादण्यात येणारी कांदा निर्यात बंदी, अपुरी साठवणूक व्यवस्था आणि बाजार हस्तक्षेपाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. यामध्ये सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे, तुळशीराम कातोरे, ज्ञानेश्वर काकड, संगीता साळवे, हेमलता शेळके, दत्ता गोंदके, बाळासाहेब भोर, अजित चौधरी, दत्ता कोंडार, योगेश भरितकर, बाळासाहेब मधे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी केरळचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री पिणरई विजयन यांच्या निवासस्थानी ईडीकडून टाकण्यात आलेल्या धाडीचाही निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप केला.

आंदोलनादरम्यान वक्त्यांनी कांद्याच्या प्रश्नावर दीर्घकालीन धोरण आखण्याची मागणी केली. कांदा साठवणूक क्षमता वाढविणे, निर्यात बंदीऐवजी निर्यात प्रोत्साहन धोरण स्वीकारणे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1