डेंग्यू-मलेरियाविरुद्ध पिंपरी-चिंचवड महापालिकेची व्यापक मोहीम; नागरिकांना स्वच्छता व डास प्रतिबंधाचे आवाहन

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरभर व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम सुरू केली आहे. स्वच्छता, डास नियंत्रण, फॉगिंग आणि जनजागृतीवर विशेष भर देण्यात आला आहे.

Jul 16, 2026 - 04:14
 0  4
डेंग्यू-मलेरियाविरुद्ध पिंपरी-चिंचवड महापालिकेची व्यापक मोहीम; नागरिकांना स्वच्छता व डास प्रतिबंधाचे आवाहन
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, डेंग्यू, मलेरिया, संसर्गजन्य आजार, फॉगिंग, अळीनाशक फवारणी, आरोग्य मोहीम,

पुणे | प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा वाढता धोका लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरभर व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी स्वच्छता, डास नियंत्रण, अळीनाशक फवारणी, फॉगिंग आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जात आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील विविध भागांत घराघरांत सर्वेक्षण, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणांचा शोध, अळीनाशक औषधांची फवारणी, धूर फवारणी (फॉगिंग) तसेच आवश्यक त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना नियमितपणे राबविण्यात येत आहेत. संशयित रुग्णांची तपासणी आणि उपचारांसाठी महापालिकेच्या रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, घर आणि परिसरात पाणी साचू देऊ नये, पाण्याच्या टाक्या, कुलर, फुलदाण्या, टायर यांसारख्या वस्तूंची नियमित स्वच्छता करावी तसेच आठवड्यातून किमान एकदा अशा ठिकाणांची तपासणी करावी. पिण्याचे पाणी उकळून किंवा शुद्ध करून वापरणे आणि अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजनांबरोबरच नागरिकांचे सक्रिय सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. ताप, अंगदुखी, उलट्या, जुलाब किंवा इतर संशयास्पद लक्षणे आढळल्यास विलंब न करता जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा. प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून परिसरात पाणी साचू न देण्याची काळजी घेतल्यास डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असे त्यांनी नमूद केले.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही नागरिकांना प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने प्रत्येकाने स्वच्छता, डास प्रतिबंध आणि वेळेत वैद्यकीय उपचार यांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेने नागरिकांना स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, 'स्वच्छ परिसर – निरोगी शहर' हा संदेश या मोहिमेद्वारे देण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0