मोशी दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत; दोषींवर कठोर कारवाईसह महापालिकेचे ठोस निर्णय

मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची आर्थिक मदत, जखमींना १ लाखांची मदत, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि पात्र वारसांना नोकरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jul 16, 2026 - 04:22
 0  8
मोशी दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत; दोषींवर कठोर कारवाईसह महापालिकेचे ठोस निर्णय
मोशी दुर्घटना, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PCMC, महापौर रवि लांडगे,

पुणे प्रतिनिधी : रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. १५ जुलै २०२६ : मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक आधार देण्याबरोबरच दोषींवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बुधवारी झालेल्या महापालिका सभेत या संदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली.

महापालिकेने दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला असून, जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. याशिवाय, प्रकल्पाचे ठेकेदार मे. अँटोनी लारा यांच्या माध्यमातून मृतांच्या वारसांना ५० लाख रुपयांची अतिरिक्त मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च महानगरपालिका उचलणार असून, मृतांच्या कुटुंबातील पात्र वारसांना महानगरपालिका सेवेत नोकरी मिळावी यासाठी शासनाकडे आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

दुर्घटनेप्रकरणी प्राथमिक जबाबदारी निश्चित करत मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले असून, त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच दुर्घटनेची कारणे, तांत्रिक त्रुटी, प्रशासकीय दुर्लक्ष आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी केली जाणार आहे.

याचबरोबर, प्रकल्पाचे ठेकेदार अँटोनी लारा कंपनीचे प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा निरीक्षक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे.

शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महानगरपालिका सभेने पूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार सर्व प्रभागांमध्ये विकेंद्रीकृत कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, "दुर्घटनेत जीव गमावलेल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांना केवळ आर्थिक मदत देऊन आमची जबाबदारी संपणार नाही. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि भविष्याची जबाबदारी स्वीकारत, पात्र वारसांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. त्याचवेळी या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. निष्पक्ष चौकशीद्वारे जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल."

मोशी दुर्घटनेनंतर महापालिकेने घेतलेल्या या निर्णयांमुळे दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सुरक्षित आणि जबाबदारीपूर्ण करण्याच्या दिशेनेही हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0