कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात 27 वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा; वीर कुटुंबीयांचा सन्मान
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात 27 वा कारगिल विजय दिवस शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून साजरा करण्यात आला. वीर पत्नी, वीर माता-पित्यांचा सन्मान करण्यात आला तसेच कारगिल युद्धातील शौर्यगाथा आणि सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले.
कोल्हापूर प्रतिनिधी उमेश जाधव
कोल्हापूर, दि. 26 : जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात 27 वा कारगिल विजय दिवस शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, लेफ्टनंट कर्नल (नि.) विलास सुळकुडे (उपाध्यक्ष, जिल्हा सैनिक मंडळ), डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी), सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे तसेच जन स्मॉल फायनान्स बँकेचे उपाध्यक्ष एहतेशाम हावेरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. भीमसेन चवदार यांनी 1999 मधील कारगिल युद्धाची पार्श्वभूमी उलगडून सांगत भारतीय जवानांनी दाखविलेल्या शौर्याची आठवण करून दिली. त्यानंतर उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी कारगिलच्या वीर जवानांचे बलिदान देश कधीही विसरणार नसून संपूर्ण देश त्यांच्या ऋणात कायम राहील, असे गौरवोद्गार काढले.
यावेळी जन स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने वीर पत्नी, वीर माता आणि वीर पित्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी अजय पवार आणि उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी वीर कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करत जिल्हा प्रशासन त्यांच्या पाठीशी कायम उभे राहील आणि सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमात जन स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून सुमारे 13 लाख रुपये खर्च करून सैनिकी मुलींच्या वसतिगृहात केलेल्या विकासकामांचे अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी विशेष कौतुक केले. या योगदानाबद्दल जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने एहतेशाम हावेरी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे यांनी कारगिल युद्धातील 85 दिवसांपैकी 78 दिवसांचा स्वतःचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला. त्यांच्या थरारक अनुभवांनी उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि सभागृहातील वातावरण भावूक झाले.
कार्यक्रमास कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या वीर पत्नी श्रीमती सविता अशोक बिरंजे (वैरागवाडी, ता. गडहिंग्लज), श्रीमती सुनीता मछिंद्र देसाई (कोल्हापूर) यांच्यासह कारगिल आणि इतर युद्धांमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या 26 वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, विविध माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन सुहास कांबळे, कल्याण संघटक यांनी केले. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने शहीद जवानांच्या अद्वितीय शौर्याला आणि बलिदानाला मानवंदना अर्पण करत देशसेवेची प्रेरणा जपण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0