ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करा; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे निर्देश
कोल्हापूर जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. प्रलंबित पावती पुस्तके, निधी संकलनाची गती आणि उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या विभागांवर कारवाईचा इशाराही बैठकीत देण्यात आला.
कोल्हापूर | प्रतिनिधी रवी वाघमारे
कोल्हापूर जिल्ह्यातील ध्वजदिन निधी संकलनासाठी उद्दिष्ट देण्यात आलेल्या सर्व शासकीय विभागांनी १५ ऑगस्टपूर्वी आपापले निधी संकलनाचे लक्ष्य पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ध्वजदिन निधी संकलन आणि प्रलंबित निधीचा आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत विविध विभागांच्या निधी संकलनाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी प्रलंबित पावती पुस्तकांबाबत संबंधित कार्यालय प्रमुखांनी आपला अभिप्राय जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे तातडीने सादर करावा, असे निर्देश दिले. तसेच उर्वरित विभागांनी निधी संकलनाच्या कामात गांभीर्याने सहभाग नोंदवून उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.
निधी संकलनाबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या किंवा कोणतेही योगदान न देणाऱ्या कार्यालयांची गंभीर दखल घेतली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी बैठकीत दिला.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त लेफ्टनंट कर्नल) डॉ. भीमसेन चवदार यांनी माहिती देताना सांगितले की, यंदा कोल्हापूर जिल्ह्यासाठी सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांचे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
बैठकीस जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीईओ ओमप्रकाश यादव, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, सहाय्यक संचालक सुनीता नेर्लेकर, कौशल्य विकास विभागाचे सारंग कापूरकर, नायब तहसीलदार नितीन धापसे-पाटील, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ध्वजदिन निधीच्या माध्यमातून माजी सैनिक, वीरपत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याने सर्व विभागांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून निधी संकलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0