पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका युद्धपातळीवर; नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – महापौर रवि लांडगे
पिंपरी-चिंचवडमध्ये अतिमुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची महापौर रवि लांडगे यांनी विविध पूरग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीच्या मदत आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांनी विविध पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याचे तसेच कोणत्याही नागरिकाला अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
महापौरांनी सर्वप्रथम चिखली प्राधिकरण परिसरातील घरकुल येथे भेट देऊन पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी केली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांसह लवकरच संयुक्त बैठक घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.
यानंतर महापौरांनी चिखली येथील महापालिका शाळेत उभारण्यात आलेल्या निवारा केंद्राला भेट देऊन स्थलांतरित नागरिकांची विचारपूस केली. निवास व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, भोजन, औषधोपचार तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का, याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पूरग्रस्त नागरिकांच्या सन्मानाला धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी नगरसेवक कुंदन गायकवाड, योगिता नागरगोजे, सचिन सानप, सोनम मोरे, विकास साने, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले, "आपत्तीच्या काळात प्रशासन ही केवळ यंत्रणा नसून नागरिकांचा आधार असते. संकटाच्या या काळात प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका खंबीरपणे उभी आहे. कोणालाही एकटे सोडले जाणार नाही.
त्यानंतर महापौरांनी चिखली परिसरातील इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सद्यस्थितीची माहिती घेतली. पूरपरिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक आणि मदतकार्याच्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
महापालिका प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ महापालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0