जनगणना प्रक्रियेत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जनगणना २०२७ अंतर्गत गृहसूची आणि गृहनिर्माण जनगणना प्रक्रियेचा आढावा घेताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जनगणना प्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. माहिती संकलन अचूक आणि वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. २५ मे २०२६ : जनगणना ही अत्यंत महत्त्वाची आणि कालमर्यादित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही. जनगणना प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या गृहसूची आणि गृहनिर्माण जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंते संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंते बापूसाहेब गायकवाड, प्रेरणा सिनकर, मनोज सेठिया, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले की, जनगणना प्रक्रियेदरम्यान माहिती संकलन आणि नोंदींची अचूकता अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक नोंद त्रुटीविरहित आणि विश्वासार्ह राहण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे.
ते म्हणाले की, जनगणना ही केवळ नियमित प्रशासकीय प्रक्रिया नसून भविष्यातील नागरी सुविधा, विकास आराखडे आणि धोरणनिर्मितीसाठी आधारभूत माहिती उपलब्ध करून देणारा महत्त्वाचा उपक्रम आहे.
प्रशासकीय शिस्त, माहितीची विश्वासार्हता आणि वेळेचे योग्य नियोजन यावर विशेष भर देत त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.
यावेळी उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी क्षेत्रीय स्तरावरील समन्वय वाढविण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
ते म्हणाले, "जनगणना प्रक्रियेमध्ये अचूक माहिती संकलन आणि वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रगणक, पर्यवेक्षक आणि संबंधित विभागांनी समन्वय राखून नागरिकांशी प्रभावी संवाद साधावा. प्रत्येक नोंद त्रुटीविरहित आणि विश्वासार्ह राहण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने देखरेख आणि मार्गदर्शन केले जात आहे."
बैठकीत नागरिकांनी प्रशासनाला अचूक माहिती देऊन सहकार्य करावे तसेच प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी नियमांचे काटेकोर पालन करून माहिती संकलनाची प्रक्रिया पार पाडावी, असेही आवाहन करण्यात आले.
जनगणना २०२७ अंतर्गत माहिती संकलन प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तयारी अधिक गतीमान केली आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
