‘अजित स्मृती अविट स्मृती’ छायाचित्र प्रदर्शनातून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जीवनप्रवासाचे दर्शन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘अजित स्मृती अविट स्मृती’ या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनातून अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि जीवनप्रवासाचा प्रभावी आढावा मांडण्यात आला आहे.
मुंबई | प्रतिनिधी : नरेश शिंदे
उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘अजित स्मृती अविट स्मृती’ या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनातून अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा, सामाजिक योगदानाचा आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा प्रभावी जीवनपट उलगडत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात आयोजित या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून स्वर्गीय अजितदादा पवार यांचा संपूर्ण जीवनप्रवास अत्यंत सुंदर आणि प्रभावीपणे सादर करण्यात आला आहे. त्यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची विविध पैलू या प्रदर्शनातून पाहायला मिळतात. त्यांच्या स्मृती प्रत्येकाच्या मनात कायम राहतील.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, हे प्रदर्शन केवळ छायाचित्रांचे संकलन नसून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास जतन करणारा दस्तऐवज आहे. त्यांच्या कार्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्यांना मानणाऱ्या प्रत्येक नागरिकाने हे प्रदर्शन आवर्जून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला आमदार शिवाजीराव गर्जे, सतीश चव्हाण, चंद्रदीप नरके, गोकुळ शिंदे, हिरामण खोसकर, माजी आमदार राजेश पाटील, गोकुळ संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक, सामाजिक आणि राजकीय कार्याची उजळणी करणारे ‘अजित स्मृती अविट स्मृती’ हे छायाचित्र प्रदर्शन त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न मानला जात आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0