२८ वर्षांपासून डॉक्टर असल्याचा बनाव करणाऱ्या तोतया डॉक्टराला गुन्हे शाखेकडून अटक; १० कोटींच्या CSR फंड अपहाराचा संशय
मुंबई गुन्हे शाखेने तब्बल २८ वर्षांपासून डॉक्टर असल्याचा बनाव करणाऱ्या एका तोतया डॉक्टराला अटक केली आहे. आरोपीने बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांमध्ये खाती उघडून साथीदारांच्या मदतीने CSR निधीतील सुमारे १० कोटी रुपयांच्या अपहाराचा संशय असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मुंबई | ब्यूरो अनिल सावरे
मुंबई गुन्हे शाखेच्या प्रकटीकरण शाखेने तब्बल २८ वर्षांपासून डॉक्टर असल्याचा बनाव करणाऱ्या एका तोतया डॉक्टराला अटक केली आहे. आरोपीने बनावट ओळखपत्रे तयार करून विविध बँकांमध्ये खाती उघडली असून, साथीदारांच्या मदतीने CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतील सुमारे १० कोटी रुपयांच्या अपहाराचा संशय असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष-१ ला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सुमारे ५० वर्षीय संशयित स्वतःला "Dr. Dharmendra Kumar" म्हणून परिचय देत होता. त्याने बनावट ओळखपत्रांच्या आधारे विविध बँकांमध्ये खाती उघडून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान आरोपीच्या ताब्यातील फ्लॅटवर छापा टाकण्यात आला. तेथून महाराष्ट्रासह इतर राज्यांतील व्यक्ती आणि कंपन्यांच्या नावांची कागदपत्रे, प्रोजेक्ट रिपोर्ट, बनावट ओळखपत्रे, पॅन कार्ड, व्हिजिटिंग कार्ड, विविध संस्थांची प्रमाणपत्रे तसेच वैद्यकीय उपचाराशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणाचे जाळे एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये पसरले असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
गेल्या तीन वर्षांत CSR निधीच्या माध्यमातून सुमारे १० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा संशय असून, आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या कक्ष-१ मध्ये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे, वैद्यकीय व्यवसाय अधिनियम तसेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोग अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता १६ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्याच्या इतर साथीदारांचा तसेच आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपआयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर शिळवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या कक्ष-१ च्या पथकाने तसेच जुहू पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0