अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी नाशिकमध्ये भव्य अहिराणी काव्य संमेलन व साहित्य गौरव सोहळा संपन्न
अहिराणी भाषेच्या विकास व संवर्धनासाठी नाशिक येथे जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद आणि खानदेश मराठा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अहिराणी काव्य संमेलन व साहित्य गौरव सोहळा उत्साहात पार पडला. विविध साहित्यिकांचा गौरव करण्यात आला.
नाशिक | ब्यूरो
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर जिल्ह्यांतील ग्रामीण भागाची लोकभाषा असलेल्या अहिराणी भाषेच्या जतन, विकास आणि संवर्धनासाठी नाशिक येथे महाकवी कालिदास अहिराणी रिमझिम काव्य संमेलन आणि अहिराणी साहित्य गौरव सोहळा उत्साहात पार पडला. उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद आणि खानदेश मराठा मंडळ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अहिराणी भाषेत साहित्यनिर्मिती करून भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ यांना जीवनगौरव पुरस्कार, तर सयाजीराव गायकवाड भाषा संवर्धन पुरस्कार साहित्यिक विकास पाटील यांना प्रदान करण्यात आला. तसेच दिवंगत साहित्यिक दा. गो. बोरसे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारे पुरस्कार साहित्यिक बाबुराव देसाई आणि ज्ञानेश्वर भामरे यांना प्रदान करण्यात आले. डिजिटल माध्यमातून अहिराणी भाषेचा प्रसार करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील कविता पाटील यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांबरोबरच गुजरातमधूनही अनेक साहित्यिक, कवी, संशोधक आणि अहिराणी भाषाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काव्य संमेलनात विविध कवींनी अहिराणी भाषेतील कविता सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली.
यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. नितीन ठाकरे म्हणाले की, "लिखित साहित्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून भाषेचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. बोलीभाषांसह सर्व भाषांचा व्यवहारात वापर वाढला पाहिजे. संस्कृतसारख्या भाषांचाही दैनंदिन व्यवहारात वापर होणे आवश्यक आहे."
कार्यक्रमाचे निमंत्रक प्राचार्य प्रशांत पाटील यांनी सांगितले की, अहिराणी भाषा जिवंत राहावी आणि तिचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने अहिराणी काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. "केवळ इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यानेच प्रगती होते हा समज चुकीचा असून मातृभाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे," असे त्यांनी नमूद केले.
स्वागताध्यक्ष प्राचार्य विकास पाटील यांनी आपल्या मनोगतात अहिराणी बोली ही निसर्गपूजेशी निगडित समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपणारी भाषा असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही अहिराणी भाषेला इंडो-आर्यन भाषा म्हणून मान्यता मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कवींनी आपल्या रचनांचे सादरीकरण करून अहिराणी साहित्याची समृद्ध परंपरा रसिकांसमोर उलगडली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0