श्री अंबाबाई मंदिरातील पाणीगळती ही तात्पुरती; जतन-संवर्धनाच्या कामात कोणतीही त्रुटी नाही – पुरातत्त्व विभागाचे स्पष्टीकरण

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिरातील अलीकडील पाणीगळती ही जतन-संवर्धनाच्या कामातील त्रुटीमुळे नसून, नियोजित वॉटरप्रूफिंगचे काम पूर्ण होण्यापूर्वी पावसाळा सुरू झाल्याने निर्माण झालेली तात्पुरती परिस्थिती असल्याचे राज्य पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे. पावसाळ्यानंतर उर्वरित वॉटरप्रूफिंगचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार असून, जतन-संवर्धनाची सर्व कामे वैज्ञानिक पद्धतीने सुरू असल्याचा विभागाचा दावा आहे.

Jul 14, 2026 - 20:31
 0  7
श्री अंबाबाई मंदिरातील पाणीगळती ही तात्पुरती; जतन-संवर्धनाच्या कामात कोणतीही त्रुटी नाही – पुरातत्त्व विभागाचे स्पष्टीकरण
श्री अंबाबाई मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर, पाणीगळती,

कोल्हापूर | प्रतिनिधी उमेश जाधव 

कोल्हापूर येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिरातील पाणीगळतीच्या घटनेबाबत राज्य पुरातत्त्व विभागाने सविस्तर स्पष्टीकरण देत सुरू असलेल्या जतन-संवर्धनाच्या कामांबाबत निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिरातील पाणीगळती ही जतन-संवर्धनाच्या कामाच्या गुणवत्तेतील त्रुटीमुळे झालेली नसून, नियोजित वॉटरप्रूफिंगचे काम पूर्ण होण्यापूर्वीच पावसाळा सुरू झाल्यामुळे निर्माण झालेली तात्पुरती परिस्थिती असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाने मंजूर केलेल्या जतन-संवर्धन आराखड्यानुसार मंदिरात वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनाची कामे सुरू आहेत. या कामांमध्ये मंदिराची मूळ वास्तुशैली, ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि सांस्कृतिक वारसा अबाधित राखण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच पारंपरिक चुना-आधारित साहित्याचा वापर करून पुरातत्त्वीय तत्त्वांचे काटेकोर पालन केले जात असल्याचे विभागाने सांगितले.

विभागाच्या माहितीनुसार, कासव मंडपाच्या छतावरील पाणीगळती प्रतिबंधक (वॉटरप्रूफिंग) काम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करण्यात आले होते. त्यामुळे या भागात सध्या कोणत्याही प्रकारची पाणीगळती होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र, महासरस्वती आणि महाकाली मंदिराच्या छतावरील वॉटरप्रूफिंगच्या पूर्वतयारीसाठी जुन्या मोजॅक टाइल्स काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर वॉटरप्रूफिंगचे मुख्य काम सुरू होणार होते. परंतु त्याआधीच पावसाळ्याला सुरुवात झाल्याने हे काम पूर्ण करता आले नाही. परिणामी, पहिल्या पावसात काही ठिकाणी पाणीगळती झाल्याचे विभागाने मान्य केले आहे.

ही बाब लक्षात येताच संबंधित छत तातडीने ताडपत्री (टार्पोलिन) लावून सुरक्षित करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पावसात कोणतीही नवीन पाणीगळती झालेली नसल्याचा दावा विभागाने केला आहे. तसेच पावसाळा संपल्यानंतर उर्वरित वॉटरप्रूफिंगचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

पुरातत्त्व विभागाने सोशल मीडियावर आणि विविध प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या छायाचित्रे व व्हिडिओंबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, ही दृश्ये ताडपत्री लावण्यापूर्वी पहिल्या पावसाच्या वेळी चित्रित करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून पाऊस झालेला नसतानाही तीच जुनी छायाचित्रे पुन्हा प्रसारित होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे विभागाने नमूद केले.

याशिवाय, ज्या भागात पारंपरिक चुना-आधारित वॉटरप्रूफिंगचे काम पूर्ण झाले आहे, त्या भागात एकाही ठिकाणी पाणीगळती झालेली नाही. पाणीगळती केवळ त्या भागात झाली जिथे वॉटरप्रूफिंगच्या पूर्वतयारीसाठी जुन्या टाइल्स काढण्यात आल्या होत्या आणि पावसाळ्यामुळे पुढील काम अपूर्ण राहिले.

राज्य पुरातत्त्व विभागाने प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियामधून चुकीची माहिती प्रसारित होऊन जतन-संवर्धनाच्या कामांबाबत गैरसमज निर्माण होऊ नये, असे आवाहन केले आहे. ही घटना जतन-संवर्धनाच्या गुणवत्तेशी संबंधित नसून अपूर्ण राहिलेल्या नियोजित वॉटरप्रूफिंगच्या कामामुळे निर्माण झालेली तात्पुरती परिस्थिती आहे, असे विभागाने स्पष्ट केले.

पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या पुणे विभागाच्या सहाय्यक संचालकांनी सांगितले की, राज्य पुरातत्त्व विभाग श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराच्या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून पावसाळ्यानंतर उर्वरित सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0